इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी; २२२ प्रवाशांचा जीव टांगणीला! लखनौमध्ये विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

Foto
लखनौ  : आकाशात हजारो फूट उंचावर विमान उडत असताना अचानक 'विमानात बॉम्ब आहे' अशी चिठ्ठी सापडल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. दिल्लीहून पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने विमानाचे तातडीने लखनौ विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. या विमानात २२२ प्रवासी आणि कर्मचारी होते.

टॉयलेटमधील 'त्या' चिठ्ठीने उडवली झोप
इंडिगोचे विमान (फ्लाइट ६ई ६६५०) सकाळी दिल्लीहून बागडोगरासाठी झेपावले होते. विमान हवेत असतानाच विमानातील टॉयलेटमध्ये एका कर्मचाऱ्याला हाताने लिहिलेली एक चिठ्ठी आढळली. एका टिशू पेपरवर "विमानात बॉम्ब आहे" असे लिहिलेले होते. ही माहिती मिळताच वैमानिकाने तत्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलला याची कल्पना दिली.

लखनौमध्ये तातडीने धाव

सकाळी ८:४६ च्या सुमारास एटीसीकडून लखनौ विमानतळाला या घटनेची माहिती मिळाली. सुरक्षेच्या कारणास्तव विमानाचा मार्ग वळवण्यात आला आणि सकाळी ९:१७ वाजता लखनौच्या चौधरी चरण सिंह विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. विमान खाली उतरताच सुरक्षा यंत्रणांनी आणि बॉम्ब शोधक पथकाने विमानाचा ताबा घेतला.

तपास सुरू, अफवा की कट?

एसीपी रजनीश वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. ज्या टिशू पेपरवर बॉम्बची धमकी लिहिली होती, तो पेपर कोणी ठेवला याचा तपास सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे केला जात आहे. प्राथमिक तपासात विमानाची सखोल तपासणी केली असता अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. मात्र, या धमकीमुळे विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.

प्रवाशांना बागडोगरा येथे पोहोचवण्यासाठी इंडिगोकडून पर्यायी व्यवस्था केली जात आहे. दरम्यान, वारंवार विमानांना मिळणाऱ्या या खोट्या धमक्यांमुळे विमान कंपन्या आणि प्रवाशांच्या मनस्तापात मोठी वाढ झाली आहे.